मुंबई l Mumbai

पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छ. भुजबळ यांनी केले आहे. ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या भेटीदरम्यान ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मी लवकरच चर्चा करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव असलेल्या विद्यापीठात त्यांचे स्मारक हवेच असे मत देखील त्यांनी व्यक्त केले .

गेल्या काही दिवसांपूर्वी या विद्यापीठात महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पुर्णाकृती पुतळे आपण महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून बसवले आहेत त्यामुळे आता सावित्रीबाई यांचे सुद्धा स्मारक होईलच.विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्याशी देखील विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा आणि स्मारकासंदर्भात आज चर्चा केली असल्याची माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे

यावेळी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, काही दिवसांपासून परदेशातील काही सेलिब्रिटींनी भारतात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलण्यास सुरवात केली आहे.

पण हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हणून भारतातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या विरुद्ध समाज माध्यमाद्वारे व्यक्त होत आहे.. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बाहेरच्या देशातील लोकांनी बोलू नये असं मत देशातील सेलिब्रिटींच असेल तर मग माझं त्यांना सांगणं आहे की, तुम्ही तरी शेतकरी आंदोलनावर बोला. दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनावर देशातील सेलिब्रिटी एव्हढे दिवस का व्यक्त झाले नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. हा आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे हे बरोबर आहे. पण इतके दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यावरही बोलायला हवे असे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.