मेंदूदेखील ‘हॅक’ होणार !
महाराष्ट्र

मेंदूदेखील ‘हॅक’ होणार !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

‘बीसीआय’पेक्षा अधिक प्रमाणात ‘हॅकिंग’ हा शब्द आजकाल सर्वांनाच परिचयाचा झाला आहे.  एखाद्या संगणकीय प्रक्रियेत अनधिकृतपणे घुसून कार्यपद्धती समजून घेणे आणि तिचा गैरवापर करणे म्हणजे हॅकिंग. हॅकिंगसाठी बीसीआयचा वापर करून येत्या काही वर्षांमध्ये चक्क मेंदूतील विचार आणि माहिती वाचता येणार आहे.

 डॉ. दीपक शिकारपूर  

(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)

संगणकीय तंत्रज्ञानाने मानवी जीवनाच्या विविध बाजूंना नुसता स्पर्शच केलेला नाही तर त्यामध्ये खोलवर प्रवेश केला आहे, हे आपण सातत्याने अनुभवत आहोत. आयटी म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऊर्फ माहिती तंत्रज्ञान ही संज्ञा आज अर्धशिक्षित लोकांपर्यंतही पोहोचली आहे.

संगणक आणि इतर संबंधित उपकरणांचा वाढता वापर आज सगळीकडे दिसत आहे. या डिजिटल युगात आपले जीवन सुसह्य करायचे कामही संगणक आणि इतर उपकरणे करत आहेत. गेल्या दशकापासून विविध नित्योपयोगी वस्तूही ‘स्मार्ट’ होऊ लागल्या आहेत. आजच्या या गतिमान आधुनिक युगात आपले जीवन इलेक्ट्रॉनिक साधने आणि सुविधांनी व्यापून टाकलेली आढळतात.

गेल्या दोनशे वर्षांमध्ये मानवी जीवनात झालेले बदल आणि त्याआधीच्या दोन हजार वर्षांमधल्या बदलांच्या गतीशी किंवा संख्येशी आणि प्रमाणाशी तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे असे की, या कालखंडातील पहिली दोन-तीन हजार वर्षे जगभरचे मानवी समूह साधारणपणे एकसुरी जीवन जगत होते. परंतु गेल्या दोन-तीनशे वर्षांमध्ये त्यांनी एकदम निरनिराळे शोध लावायला सुरुवात केली.

येत्या वीस वर्षांमध्ये वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्सदेखील मागे पडून ‘एंबेडेड इलेक्ट्रॉनिक्स’चे प्रमाण वाढणार आहे. लवकरच मानवी शरीरात इलेक्ट्रॉनिक भाग, संवेदक आणि चिप्स बसवले जातील. संगणकीकृत उत्पादन तंत्रामुळे उत्पादित वस्तूचा आकार छोटा करून तिची कार्यक्षमता आणि कामातील अचूकता वाढवणे शक्य झाले. आज औषधाच्या बाटल्या भरण्यापासून स्मार्टफोन्सची जुळणी करण्यापर्यंत अनेक कामे यांत्रिक हातांनी आणि डोळ्यांनी केली जातात. मानवाने निर्माण केलेल्या कोणत्याही अतिप्रगत महासंगणकापेक्षाही मानवी मेंदूच सर्वश्रेष्ठ आहे, कारण विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि नवनिर्मितीची क्षमता त्यात असल्याचा मतप्रवाह आहे. आपला मेंदू अपरिचित

समस्यांवर एखाद्या मोठ्या संगणकापेक्षाही अधिक वेगाने विचार करू शकतो (आणि त्याने काढलेले निष्कर्ष बरेचदा योग्यच असतात) हे ठळक वैशिष्ट्य आहे.शास्त्र आणि अध्यात्म यांच्या सीमा आगामी दशकात धूसर होत आहेत. जन्माला येऊन अखेरीस मरणार्‍या प्रत्येक मानवाला अमरत्वाचे एक गूढ आकर्षण अगदी सुरुवातीपासून आहे. जगातल्या सर्वच जातीधर्मातल्या तत्त्वज्ञ आणि विचारवंतांनी या विषयावर आपला मेंदू शिणवला आहे. शरीर नष्ट होते परंतु आत्मा अमर राहतो. ‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ ही आणि अशी गीतेतली वचने तर गेली हजारो वर्षे सर्वांना माहीत आहेत. मात्र

त्यामागील मूलतत्त्व व्यावहारीक पातळीवर प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. कारण शरीराबरोबरच ‘मन’ नावाची एक गोष्ट मानवाकडे आहे, जिचा खरा अर्थ अद्याप मानवालाच उलगडलेला नाही! नाशवंत बाब म्हणजे शरीर आणि सतत पुनर्जन्म घेतो तो आत्मा किंवा आपले मन हा विचार अगदी गीतेतही वारंवार सांगितला आहे. एखाद्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता लागू शकत नाही.

मेंदूतले विचार, व्यवहार कसे चालतात हे समजून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ गेली अनेक दशके करत आहेत. यामधला सर्वात मोठा अडथळा म्हणजे यासंबंधीची कोणतीही बाब थेट दृश्य स्वरुपात उपलब्ध नसणे, परंतु इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र आणि मुख्य म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीतल्या अचाट प्रगतीमुळे पूर्वी कल्पनाही करता येत नसत अशा गोष्टी आज आपण समजू तर शकतोच शिवाय त्या आपल्याला हव्या तशा (कस्टमाईझ करून) वापरूही शकतो. या लेखातून आपण आज मेंदूच्या कामांशी संबंधित काही क्षेत्रांमधल्या अनोख्या प्रगतीवर नजर टाकू. दुसर्‍याच्या मनातले विचार ओळखण्याच्या संकल्पनेवर आधारित बर्‍याच विज्ञान-काल्पनिका पूर्वी लिहिल्या गेल्या. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला ‘इंसेप्शन’ हा हॉलिवूडपट अशाच कल्पनेवर आधारित होता. मनाच्या खोल विवरात स्वप्नांद्वारे प्रवेश करून स्वप्नातल्या स्वप्नात एखादी गोष्ट करणे ही जवळ जवळ अशक्यप्राय बाब या सिनेमात मांडली होती. परंतु आता सूक्ष्म तंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी) आणि इतर संगणकीय संवाद माध्यमांमधल्या प्रगतीमुळे मेंदूच्या विचारलहरींशी संगणकाचा थेट संवाद घडवणारे ‘ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस’ अर्थात बीसीआय हे उपकरण प्रत्यक्षात उतरले आहेच शिवाय ते तितकेसे अप्राप्यदेखील

राहिलेले नाही.  संगीताच्या शौकिनांमध्ये लोकप्रिय असलेल्या काही खास हेडफोन्समध्ये संगीतामधून विशिष्ट ‘मूड’ तयार करण्यासाठी बीसीआय वापरले जातात. याला ‘इमोटिव बीसीआय’ असे नाव आहे. ‘बीसीआय’पेक्षा अधिक प्रमाणात ‘हॅकिंग’ हा शब्द आजकाल सर्वांनाच परिचयाचा झाला आहे. एखाद्या संगणकीय प्रक्रियेमध्ये अनधिकृतपणे घुसून तिची कार्यपद्धती समजून घेणे आणि तिचा गैरवापर करणे म्हणजे हॅकिंग.

Deshdoot
www.deshdoot.com