
मुंबई | Mumbai
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Ex Mayor Kishori Pednekar) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण, ईडीने (ED) कोविड-१९ कथित बॉडी बॅग (Body Bag) प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासोबत माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.
महिन्याभरापूर्वी ईडीने पेडणेकरांविरोधातील आरोपांप्रकरणाची कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून मागवली होती. या विभागाकडून पेडणेकरांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यात किशोरी पेडणेकर आणि वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२० आणि १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत मृत कोरोना रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २ हजार रुपयांऐवजी सहा हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने म्हटले आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.