
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज (Drugs) प्रकरण चांगलेच गाजत असून पोलिसांनी (Police) नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापा (Raid) टाकून मोठी कारवाई केली आहे. त्यानंतर आता मिराभाईंदर गुन्हे शाखेने (Mirabhainder Crime Branch) पालघर जिल्ह्यातील (Palghar District) एका ड्रग्जच्या कारखान्यावर छापेमारी करत मोठी कारवाई केली.या कारवाईत ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल जप्त करण्यात आला असून यामुळे ड्रग्ज माफियांचे धाबे पुन्हा एकदा दणाणले आहेत....
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामधील (Mokhada Taluka) एका ड्रग्जच्या कारखान्यावर मिराभाईंदर गुन्हे शाखेने हा छापा टाकला असून यात कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. एका फार्म हाऊसवर हा कारखाना (Factory) चालू असल्याचे बोलले जात असून या संदर्भातील आरोपीला वसईमधून अटक (Arrested) करण्यात आल्याचे समजते. मिराभाईंदर गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती.
दरम्यान, या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून स्थानिक पोलिसांकडे कुठलीही माहिती नसल्याचे बोलले जात आहे. तसेच राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या ड्रग्ज (Drugs) प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांचे ड्रग्ज प्रकरणात नाव घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. तर मंत्री भुसे यांनी अंधारे यांचे आरोप फेटाळत 'माझी नार्को टेस्ट करा, कधीही चौकशी करा,' असे म्हटले आहे. तसेच मंत्री देसाई यांनी अंधारे यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) ड्रग्जविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.