विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती वितरित करा

- उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश
विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती वितरित करा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती ( scholarships )संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी, असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Higher and Technical Education Minister Uday Samant )यांनी गुरुवारी दिले.

विद्यार्थ्यांची कागदपत्रे देण्यास महाविद्यालयांनी नकार देऊन नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सहकार्य करावे. याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सामंत यांनी दिला.

उदय सामंत यांनी आज मंत्रालयात बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती संदर्भात आढावा घेतला. यावेळी बोलताना सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांना सर्व सुविधा सुद्धा वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजे.

अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून विद्यार्थी आणि संस्था अडचणीत येत आहेत. यासाठी संबंधित विभागाने समन्वयातून या अडचणी तातडीने दूर करून मागील दोन वर्षापासून जी शिष्यवृत्ती प्रलंबित आहे, ती तातडीने वितरित करण्यात यावी.

या बैठकीला विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आभा शुक्ला, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोलथे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com