धुळ्यासह परिसरात अवकाळीच्या झळा

धुळ्यासह परिसरात अवकाळीच्या झळा

धुळे  – 

शहरासह परिसराला आज दुपारी अर्धा तास वादळासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळामुळे शहरात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तसेच विद्युत खांबही वाकले व विद्युत तारा तुटल्या.

यामुळे शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच बाजार समितील कांदा व मका पाणीखाली गेल्याने लाखोंचे नुकसान झाले.

शहरासह परिसरात आज सकाळपासून ऊन- सावलीचा खेळ सुरू होता. दुपारी दोन वाजेनंतर वातावरणात बदल झाला. आकाश भरून आले. दुपारी 2.10 वाजता पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीपासुन पावसाचा जोर जास्त होता. त्यात वादळही सुरू झाले. सुमारे अर्धातास पावसाने शहराला झोडपून काढले.  अचानक आलेल्या पावसामुळे बाजारसमितीतील व्यापार्‍यांसह  फेरीवाल्याचीही तारांबळ उडाली. बाजार समितीत उघड्यावर

ठेवण्यात आलेले धान्य, कांदा व मका पाण्याखाली गेले. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

वादळामुळे शहरातील दत्तमंदिर चौक, वाडीभोकर  रोड, पारोळा रोड, ऐंशी फुटी रोड, चाळीसगाव  रोड आदींसह अन्य ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर मालेगाव रोडवरील आस्था हॉस्पिटलनजीक मोठे चिंच झाड उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच विद्युत खांबही वाकले. विद्युत खांब वाकल्यामुळे विद्युत वाहिन्या खंडीत झाल्या. यामुळे शहरातील काही भागात विज पुरवठा खंडीत झाला होता.

शहरातील मनपा शाळा क्र. 3 चे पत्रे वादळामुळे उडाले. तसेच पीओपी देखील खाली पडले. पंरतू शाळेतील विद्यार्थी  बचावले.

शहरातील विविध रस्त्यावर पाणी साचले होते. तसेच शाळांच्या मैदानांवरही पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com