धुळ्यात 29 लाखांचा गुटखा जप्त
महाराष्ट्र

धुळ्यात 29 लाखांचा गुटखा जप्त

Balvant Gaikwad

हैद्राबाद येथून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे गुटख्याची तस्करी होत असतांना धुळे तालुका पोलिसांनी सदर तस्करी रोखली. तर 16 लाख 95 हजारांची गुटखा आणि 12 लाखांचा कंटेनर असा एकूण 28 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना आज रात्री चाळीसगावकडून धुळ्याकडे कंटेनर ट्रकमध्ये अवैध पानमसाला गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने धुळे-सोलापूर राज्य मार्गावर नाकाबंदी केली. त्यावेळी पहाटे 1 वाजता केए 01 एएफ 2392 क्रमांकाचा आयशर कंटेनर ट्रक चाळीसगावकडून धुळ्याकडे येतांना आढळून आला. ट्रकचा चालक अब्दुल्लाह अबु कलाम याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली.

त्यामुळे पथकाला संशय आला. ट्रकची तपासणी केली असता कंटेनरच्या दरवाजाजवळ पांढर्‍या प्लॉस्टीक पोत्यामध्ये सागर पानमसाला नावाच्या बॅग दिसल्या. याबाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याने उत्तर दिले नाही. पोलिसांनी 16 लाख 47 हजार रुपये

किंमतीच्या सागर पानमसाला गुटख्याच्या 61 पांढर्‍या प्लॉस्टीचे पोते व 48 हजार रुपये किंमतीचे सहा पोत्यांमध्ये सागर पानमसाला आढळून आला. पोलिसांनी सदर सागर पानमसाला आणि कंटेनर असा 28 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोना हेमंत बोरसे, पोकॉ अमोल कापसे, पोकॉ सुरेश पावरा, राकेश शिरसाठ, सुमित चव्हाण यांच्या पथकाने केला. पोलिसांनी ट्रक चालक अब्दुल्लाह अबु कलाम याला ताब्यात घेतले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com