
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात (Kokan) जाणार्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणार्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून (Toll) सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत...
आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणार्या भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकणात जाणार्या गणेशभक्तांना टोल मधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत.
भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.
पथकर नाक्यांवर गणेश भक्तांशी वाद घालू नका. पथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचेही शिंदे यांनी सांगितले.