
परभणी | Parbhani
राज्य सरकारचा (State Government) महत्वाचा उपक्रम असलेला 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम आज परभणीमध्ये (Parbhani) पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलतांना विरोधी पक्षांवर (Opposition Parties) सडकून टीका केली. तसेच एक भोंगा सकाळी ९ वाजता सुरू होतो, असे म्हणत फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला...
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, "हे सरकार सामान्यांकरता काम करणारे सरकार आहे. आज आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीकाच (Criticized) करतात. सकाळी ९ वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री १० वाजेपर्यंत दुसरे भोंगे सुरू असतात. माझा यांना सवाल आहे. आमच्यावर पाहिजे तेवढी टीका करा, आम्ही टीकेला घाबरत नाही. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत," असे फडणवीसांनी म्हटले
पुढे बोलतांना ते म्हणाले की, पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील (Marathwada) गोदावरी खोऱ्यात आणायचा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील (Marathwada) मागील पिढीने दुष्काळ पहिला असून पुढील पिढीला मात्र दुष्काळ पाहू देणार नाही. मराठवाड्यात प्रत्येक चार वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. २०१४ साली ५३ टक्के पाऊस (Rain) होता. २०१८ साली ६४ टक्के पाऊस होता. आता देखील ५० टक्क्याच्या जवळपास पाऊस पडला आहे.
त्यामुळे मराठवाड्याला कायमचा दुष्काळमुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून त्याबाबत आम्ही निर्णय घेतला. त्यासाठी काही उपयोजना केल्या असून मराठवाडा ग्रीड योजना आणली. यामुळे मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एखाद्या भागात पाऊस जास्त झाल्यास तिथून दुसऱ्या ठिकाणी पाणी नेण्यात येईल, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मागील अडीच वर्षात या कामांना ब्रेक लागला होता. पण, आता पुन्हा आम्ही हे काम सुरु केले आहे. मराठवाडा ग्रीड योजनेसाठी आपण केंद्राकडे निधीची मागणी केली असून आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देतील अशी अपेक्षा आहे. तर पश्चिमी वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणण्याची योजना आणली. पण मागील अडीच वर्षात यावर काम झाले नाही. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात या कामाला देखील आपण गती देणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
तसेच फडणवीस पुढे म्हणाले की, जसा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) झाला तसाच नागपूर ते गोवा (Nagpur to Goa) असा शक्तिपीठ महामार्ग करण्यात येणार आहे. या महामार्गाचा फायदा मराठवाड्याला होणार असून या प्रकल्पामुळे मराठवाड्याचे भाग्य उजळेल असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परभणीवर प्रेम असून येत्या काळात परभणीमध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात येतील, असेही फडणवीसांनी म्हटले.