पुणे |प्रतिनिधी|Pune

पुण्यातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षीय युवतीने रविवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या युवतीचे राज्य सरकारमधील

एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना भेटून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांनी या प्रकरणातील सत्य समोर आणावं असं म्हटलं आहे. एका तरुणीची अशाप्रकारे झालेली आत्महत्या आणि त्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संशयाचा वर्तुळ तयार झालं आहे. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणायला पाहिजे, हे प्रकरण पोलिसांनी दाबू नये असे पुण्यात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले.

कोण आहे पूजा चव्हाण ?

पूजा चव्हाण (वय 23 वर्षे) ही मुळची बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी काही दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. चार दिवसांनंतर देखील या आत्महत्येचं गूढ कायम असल्यानं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केलीय.