करोनावरील लसी, औषधांवर सवलत द्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीएसटी परिषदेत मागणी
करोनावरील लसी, औषधांवर सवलत द्या

मुंबई । प्रतिनिधी

देशातील सर्व राज्ये कोरोनाविरुद्ध निकराने लढत आहेत. ही लढाई आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी कोरोनासंदर्भात उपयोगात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक सवलत देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ४३ व्या वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परिषदेत केली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडलेल्या बैठकीत पवार हे पुण्यातून सहभागी झाले होते.

मेडीकल ग्रेड ऑक्सिजन, ऑक्सिजन ऑक्सीमीटर, पल्स ऑक्सिमीटर, कोविड टेस्टींग किट्स आदी वस्तूंची ग्राहकांकडून परस्पर खरेदी होते. या वस्तुंनाही जीएसटी करात सवलत मिळावी. छोट्या करदात्यांसाठी विचारपूर्वक सुलभ करप्रणाली आणावी. गेल्या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला येणे असलेली २४ हजार कोटींची जीएसटी भरपाई त्वरीत मिळावी. कोविडकाळात लागू लॉकडाऊन परिस्थीतीमुळे राज्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन राज्यांना पुरेसी भरपाई मिळण्यासाठी संबंधित निकषांचा फेरविचार करावा, आदी मागण्या पवार यांनी बैठकीत मांडल्या.

लॉकडाऊनमुळे झालेल्या महसूल हानी आणि आर्थिक दुष्प्रभावांचे निराकरण येत्या एक-दोन वर्षात होणे शक्य नसल्याने, महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी वर्ष २०२२-२३ ते वर्ष २०२६-२७ असा पुढील पाच वर्षांसाठी वाढविण्यात यावा.पेट्रोल, डिझेल सारख्या वस्तूंवरील विविध उपकर आणि अधिभारापोटी केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. वर्ष २०२०-२१ मध्ये सुमारे ३.३० लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यांचे हात बळकट करण्यासाठी या निधीचे राज्यांना सुयोग्यपणे वाटप करावे, आदी मागण्या अजित पवार यांनी महाराष्ट्राच्यावतीने केल्या.

त्रैमासिक विवरणपत्र आणि त्रैमासिक कराचा भरणा

सध्या लहान करदाते मासिक कर भरणा करतात आणि त्रैमासिक विवरणपत्र दाखल करतात. ही पध्दत त्रैमासिक कर भरणा आणि त्रैमासिक परताव्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. कर प्रणाली लहान करदात्यांसाठी सुलभ करण्याची आवश्यकता आम्ही समजू शकतो. तथापि लहान करदात्यांपर्यत प्रस्तावित पध्दतीचा लाभ पोहचण्यासाठी यावर येणाऱ्या अभिप्रायांचा योग्यपणे अभ्यास करुन ही योजना राबविण्यात यावी. ज्यायोगे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात यश मिळेल, असे पवार यांनी सांगितले.

जीएसटी कराची प्रलंबित भरपाई

सन २०२०-२१साठी महाराष्ट्र राज्यास जीएसटी कराची भरपाई देयता सुमारे रुपये ४६ हजार कोटी रुपयांची होती. आतापर्यंत राज्यास फक्त २२ हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाची सुमारे २४ हजार कोटींची भरपाई राज्यास मिळणे अद्याप प्रलंबित आहे. कोरोना महामारीच्या काळातील राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करुन उर्वरित नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, याचा पुनरुच्चार पवार यांनी केला.

पेट्रोल,डिझेल इत्यादी इंधनावर आकारण्यात येणाऱ्या विविध उपकर वअधिभारातून गोळा केलेली रक्कम केवळ भारत सरकारला उपलब्ध आहे. (सन २०२०-२१ मध्ये अंदाजे ३.३० लाख कोटी रुपये) कोरोना महामारीच्या विरुध्द लढा देण्यासाठी राज्यांसोबत या रकमेचे सुयोग्यपणे वाटप करण्यात यावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com