रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या

रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे.

राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी. राज्यात दररोज आठ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्याही टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थिती विषयी माहिती देतांना राजेश टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसीवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.

या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले,महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यातून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अडविली जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याविषयी केंद्रीय गृहसचिवांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतूक करण्यात यावी यासाठी केंद्र सरकारने रेल्वे विभागाला निर्देश देण्याची मागणी बैठकीत केली.

हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या यंत्रांचे वाटप केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. देशभरात १३२ प्लांट देण्यात येणार असून महाराष्ट्रातील स्थिती लक्षता घेता त्यातील जास्तीत जास्त प्लांट महाराष्ट्राला मिळावेत, अशी मागणी करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

कोरोना विषाणुची जनुकीय संरचना बदलली का याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहे. त्यातील ११०० पैकी ५०० नमुन्यांची तपासणी झाली असून त्याविषयी सविस्तर अहवाल केंद्र सरकारनेकडून दिला जाणार आहे. सर्वात जास्त संसर्ग करण्याची क्षमता या विषाणुत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र याविषयी सविस्तर माहिती संशोधनाअंती दिली जाणार आहे, असे टोपे म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com