मृत गोविंदाच्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मृत गोविंदाच्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांची मदत

मुंबई|प्रतिनिधी| Mumbai

दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यभर जे गोविंदा जखमी झाले त्यांना योग्य उपचार मिळावेत जेणेकरून कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी नियंत्रण पथकास निर्देश देण्यात आले होते.दुर्देवाने विलेपार्ले येथील संदेश दळवी (२३) यांचा मृत्यू झाला असून, त्याच्या कुटूंबियांना १० लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी धानसभेत सांगितले.
आज विधानसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.

त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, कोरोना कालावधीत दोन वर्षे सण साजरे करता आले नाही. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने पारंपरिक सण साजरे केले जातील. नुकताच दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मृत गोविंदांच्या कुटूंबियांना १० लाख, दोन अवयव गमावल्यांना साडेसात लाख, जखमींना ५ लाख रुपये आणि सर्वांवर मोफत उपचाराची घोषणा केली होती.

या सणाच्यावेळी सर्व जखमी गोविंदावर योग्य उपचार व्हावेत, कुणाचाही मृत्यू होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सात अधिकाऱ्यांचे पथक नेमले होते. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यांशी संपर्क साधण्यात आला होता. याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदांना तत्काळ आर्थिक मदत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com