डी. एस. कुलकर्णी यांचा ईडीने जप्त करून सील केलेल्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला

7 लाखांचा ऐवज लंपास
डी. एस. कुलकर्णी यांचा ईडीने जप्त करून सील केलेल्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला
डी. एस. कुलकर्णीDSK

पुणे |प्रतिनिधी|Pune

गुंतवणुकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक प्रकरणात कारागृहात असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा ईडीने जप्त करून सील केलेल्या बंगल्यात चोरट्यांनी सील तोडून चोरी केली आहे. त्यामध्ये चोरट्यांनी फोडून ७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यातील चतुःश्रुंगी मंदिराजवळ डीएसकेंचा ४० हजार चौरस फुट जागेत पसरलेला बंगला आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा बंगला ईडीने जप्त केला होता. तसंच सील केला होता. या बंगल्याचं सील तोडून चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला आहे. याबद्दल भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या डीएसके यांच्या नातेवाईक आहेत. डीएसके कुटुंबावर ठेवीदारांची फसवणूक यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली. सध्या डीएसके कारागृहात आहेत. दरम्यान, ईडीकडून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यात सेनापती बापट रस्त्यावरील सप्तशृंगी बंगलाही जप्त केलेला आहे.

चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. बंगल्यामधील ८ एल ई डी टीव्ही, कॉम्प्युटर, ३ सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदी, कॅमेरा, गिझर, पिठाची गिरणी असा एकूण ६ लाख ९५ हजार रुपयांचा माल चोरुन नेला आहे अशी माहिती भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्यादीत दिली आहे. तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी ईडीचे अधिकारी, पोलीस व पंच यांना बोलवून घेत पाहणी केली असता चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत.

Related Stories

No stories found.