Cyclone Gulab : पुढील ४८ तास महत्त्वाचे!
File Photo

Cyclone Gulab : पुढील ४८ तास महत्त्वाचे!

राज्याच्या 'या' भागात चक्रीवादळाचा परिणाम दिसणार

मुंबई (Mumbai)

गुलाब चक्रीवादळ काल संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण उडीशामधील कलिंगपट्टणम ते गोपाळपूरमध्ये धडकल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे आणि हे चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरीत झाले आहे. दरम्यान, हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे पुढे सरकत असल्यानं पुढील ४८ तासांत धुवांधार पावसाची शक्यता आहे. (IMD predicts heavy to heavy rainfall in some districts of Maharashtra)

महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यात राज्यातील ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे तर १० जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव अशा सात जिल्ह्यांमध्ये २८ आणि २९ सप्टेंबरला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार आणि मुसळधार पावसाच्या लसी कोसळणार आहेत.

मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या १० जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ सप्टेंबरपासून पुढील १ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे. येथील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

तसेच गुलाब चक्रीवादळामुळे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ दरम्यान कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोकण किनारपट्टी भागात ४० ते ५० आणि ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय समुद्र किनारपट्टीच्या भागातील गावांनाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे.

Related Stories

No stories found.