निवृत्त एसीपी असल्याचा धाक दाखवून शिक्षिकेवर बलात्कार

निवृत्त एसीपी असल्याचा धाक दाखवून शिक्षिकेवर बलात्कार

पुणे |प्रतिनिधी| Pune

एका ३८ वर्षीय शिक्षिकेवर व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अवस्ती नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बलात्कार केल्यानंतर महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून शाळेत आणि घरच्यांना दाखवेन अशी धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. तसेच मी निवृत्त एसीपी आहे, माझे कोणी काही करू शकत नाही. ही बाब कोणाला सांगितल्यास घरच्यांना जिवंत सोडणार नसल्याची धमकी आरोपीने पीडितेला दिल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

आरोपीचे विकास अवस्ती असे नाव असून आपण एसीपी असल्याची बतावणी त्याने केली. पण प्रत्यक्षात तो एसीपी नसल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अवस्ती अद्याप मोकाट असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी ३८ वर्षीय शिक्षिकेने सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शिक्षिका असून त्यांना पैश्यांची अडचण असल्याने त्यांनी आरोपीकडे पैश्यांची मागणी केली. आरोपीने दरमहा दहा टक्क्यांनी व्याजाने पैसे देतो, असे सांगत पीडित महिलेला घरी बोलावले. दोन कोऱ्या चेकवर आणि कागदावर सह्या घेतल्या. पीडितेला सॉफ्ट ड्रिंक प्यायला दिले आणि पीडितेवर बलात्कार केला.

त्यानंतर महिलेला पैसे न देता पीडितेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून पाठवून दिले. या घटनेमुळे पीडित शिक्षिका घाबरली होती. पीडित महिला कार्यरत असलेल्या शाळेत आरोपी अवस्ती गेला. तिथे पीडितेला विवस्त्र अवस्थेतील फोटो दाखवले व शाळेत आणि घरच्या व्यक्तींना फोटो दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली.

दरम्यान, आरोपीने दुचाकीवर बसवून पीडितेला घरी नेले. बदनामी होईल या भीतीने पीडित शिक्षिका दुचाकीवर बसली. तिला आरोपी घरी घेऊन गेला, तिथे पुन्हा जबरदस्ती करत बलात्कार केला. आरडाओरडा केलास तर मारून टाकेन, अशी धमकी अवस्तीने दिली. जर तू हे घरी सांगितलेस तर तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही.

मी निवृत्त एसीपी आहे, कोणी ही माझे काही करू शकत नाही, असे देखील आरोपी म्हणाल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकरण जास्त गंभीर होत असल्याचे आणि अवस्ती देत असलेला त्रास पाहून महिलेने पोलीस ठाणे गाठत त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com