भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम तयार करा

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्देश
भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम तयार करा

मुंबई । प्रतिनिधी

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीसह होल्डिंग कपंनी या चारही कंपन्यांसह महाऊर्जाने भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. उमेदवारांना तीनही कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे यादृष्टीने परीक्षेच्या तारखा निश्चित कराव्यात, असे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी दिले.

वीज कंपन्यांमधील अनुकंपा तत्त्वावरील करायच्या नेमणुका, नवीन पदांची भरती तसेच पदोन्नती या अनुषंगाने राऊत यांनी आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली.

न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली भरती लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी न्यायालयात आपली बाजू सक्षमपणे मांडून पाठपुरावा करावा. शासनाच्या निर्देशानुसार भरती प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवल्यास न्यायालयात याचिका दाखल होण्याचे प्रमाण होईल, असे राऊत यांनी बैठकीत सांगितले.

कंपनीमध्ये कर्तव्य बजावलेला कर्मचारी दुर्देवाने मयत झाल्यानंतर त्याच्या वारसाला लवकरात लवकर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिल्यास खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. अनुकंपा नियुक्त्यांबाबत संवेदनशीलपणे आणि सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला पाहिजे. या नियुक्त्या वर्षानुवर्षे रखडणे ही बाब त्या कुटुंबावर अन्यायकारक ठरते. यासाठी लवकर नियुक्त्या देण्याच्या दृष्टीने कंपन्यांनी राज्यस्तरावर काही धोरण बनवता येते का याबाबत चर्चा करुन माहिती सादर करावी, अशी सूचना ऊर्जामंत्र्यांनी यावेळी केली.

महापारेषण प्रमाणे इतर दोन्ही कंपन्यांनी आपल्या मनुष्यबळाची पुनर्रचना करुन नवीन भरती तसेच समकक्ष पदांचे एकत्रीकरण करावे. कर्मचाऱ्यांना बदलीच्या आणि पदोन्नतीच्या समाधानकारक संधी उपलब्ध होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देशही राऊत यांनी बैठकीत दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com