अपूर्ण सुविधांमुळे 'मार्ड' आक्रमक

अपूर्ण सुविधांमुळे 'मार्ड' आक्रमक

पुणे(प्रतिनिधि)—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यात बाहेरच्या शहरातूनही कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी पुण्यामध्ये येत आहेत. त्याचा ताण येथील आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ससून रुग्णालयात खाटा वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र याला ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड'ने विरोध दर्शवला आहे.

प्रशासनाने खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच पुरेसे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, वैद्यकीय कर्मचारी वर्ग सह इतर आवश्यक सुविधांचा पुरवठा आधी करावा अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. शनिवारपासून काम बंद करत संपावर जाण्याचा इशारा 'मार्ड' ने दिला. मात्र, काम बंदचा इशारा देतानाच कोरोना वॉर्डसह तातडीच्या कोणत्याही सेवेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे मार्डतर्फे सांगण्यात आले आहे.

मार्डचे सचिव ज्ञानेश्वर जामकर म्हणाले, गेल्या वर्षभरापासून आम्ही रुग्णसेवेचे काम करीत आहोत. सध्या ससूनमध्ये ५५० कोरोना आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र, निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढविले तर किमान १०० डॉक्टरांची गरज भासणार आहे. तरच रुग्णांना चांगली सेवा देणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यांच्यापुढेही आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत. आमची मनुष्यबळ वाढविण्याची मागणी आहे. शनिवारपासून तातडीच्या नसलेल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे. कोरोना वॉर्ड, कॅज्युलिटी, आयसीयू, लेबर रूम, सर्व प्रकारच्या तातडीच्या शस्त्रक्रिया वगळता इतर सेवा देणे बंद ठेवण्यात येणार आहे.

दुसऱ्या लाटेची कल्पना जर डिसेंबर 2020 लाच आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी केली गेली नाही असा सवाल उपस्थित करत विद्यार्थी म्हणाले, मनुष्यबळाशिवाय बेड वाढवल्यामुळे पेशंटची उपचार व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे कोलमडून जाईल. तसेच बेड तर तयार करण्यात येतील पण त्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ,साधनसामुग्री प्रशासनाकडे आहेत का? कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर्ससाठी क्वारंटाईन, आयसोलेशनची सुविधा नाही, त्यामुळे एका महिन्यात आमचे ८० निवासी डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले. आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजनांसाठी विनंती करत असून त्यावर पावले आतापर्यंत प्रशासनाकडून उचलली गेलेली नाही.

खाटांची संख्या वाढवणार

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पुण्यातील रुग्णालयात बेड्सची मोठी कमतरता भासत आहे. अशावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयात अजून 300 बेड कोविड रुग्णांसाठी वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ससूनमधील कोरोना रुग्णांसाठीच्या बेड्सची संख्या 500 वरुन 800 वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com