आणखी कडक निर्बंध की लॉकडाऊन?

आज सर्वपक्षीय बैठक
आणखी कडक निर्बंध की लॉकडाऊन?

मुंबई (प्रतिनिधी) -

राज्यात करोना रूग्णांची विक्रमी वेगाने होणारी वाढ आणि आरोग्य यंत्रणेवर आलेला असह्य ताण या पार्श्वभूमीवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत करोनाची साखळी तोडण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्याचा किंवा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत रोज हजारो रुग्णांची नव्याने भर पडत आहे. रुग्ण वाढल्याने आरोग्य सुविधा अपुर्‍या पडू लागल्या आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 3 एप्रिलपासून नवे निर्बंध लागू केले. तरीही रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकार चिंतेत आहे.

वाढत्या करोना रुग्णांमुळे स्थिती हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. बेडस, औषधे यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसींचा पुरवठा कमी झाल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. लसींच्या पुरवठयावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. सध्या शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तरीही कोरोनाची साखळी तोडण्यास हे निर्बंध पुरेसे ठरताना दिसत नाहीत. त्यासाठी कडक लॉकडाउनच हवा असे काहींचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील आठवड्यातील गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दोन सुट्टया लक्षात घेऊन पूर्ण आठवडा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय होऊ शकतो.

दरम्यान,मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात जर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर तीन आठवडयांच्या कडक लॉकडाउनची गरज असल्याची भूमिका व्यक्त केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com