COVID19 : पुणे जिल्ह्यात हॉटस्पॉट गावांची संख्या दुपटीने वाढली

COVID19 : पुणे जिल्ह्यात हॉटस्पॉट गावांची संख्या दुपटीने वाढली
करोना

पुणे(प्रतिनिधि)

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात देखील प्रचंड वेगाने होत असून, पुणे जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात करोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट गावांची संख्या १४४ एवढी होती. पण ही संख्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत वेगाने वाढत असून, हॉटस्पॉट गावांची संख्या दुपटीने वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोना हॉटस्पॉट गावांची संख्या तब्बल 308 वर जाऊन पोहचली आहे.

करोनाच्या दुस-या लाटेत जिल्ह्यात दोन प्रकारची गावे दिसत आहेत. हॉटस्पॉचट गावांची संख्या वाढ असताना आजही एकही कोरोनाबाधित रुग्ण तब्बल 444 गावांमध्ये नाही. जिल्ह्यात आज 308 गावे कोरोनाची केंद्र बनली आहेत. त्यामध्ये शिरूर, जुन्नर, हवेली, दौंड, इंदापूर तालुक्‍यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावे आहेत.

20 सप्टेंबर 2020 रोजी करोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक 144 हॉटस्पॉट गावांची नोंद झाली. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेग मंदावल्यामुळे अनेक नियम शिथिल झाले. पण कोरोनाने फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा डोक वर काढले आणि अवघ्या महिन्याभरात 10 मार्च रोजी ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या 41 वर पोहचली.

ही संख्या मार्चअखेर 131 एवढी होती. यामध्ये दुप्पट वाढ होवून 308 वर पोहचली आहे. सुरुवातीला हवेली, शिरूर, इंदापूर, बारामती आणि खेड या तालुक्‍यांमध्ये बाधित सापडण्याचे प्रमाण अधिक होते. पण, वेल्हा तालुका सोडला तर अन्य सर्व तालुक्‍यांमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च अखेरनंतर वेल्हे तालुक्‍यातही कोरोनाबाधित सापडू लागल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com