पंढरपुरात उद्यापासून संचारबंदी

नऊ मानाच्या पालख्यांना परवानगी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महापूजा
पंढरपुरात उद्यापासून संचारबंदी

पंढरपूर - करोना संकटामुळे आषाढी एकादशीला(1जून) पंढरपूरला गर्दी होऊ नये म्हणून मंगळवारी(30जून) दुपारी दोन वाजल्यापासून साडेतीन दिवसांसाठी पंढरपूर शहरासह आसपासच्या नऊ गावांच्या हद्दीत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. सोलापूरचे जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

पंढरपूर शहरासह आसपासच्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपूर, कोर्टी, गादेगाव शिरढोण व कौठाळी या नऊ गावांच्या हद्दीत मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते 3 जुलै रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण संचारबंदीचा अंमल राहणार आहे. ही माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजीव जाधव व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

संचारबंदीच्या काळात पंढरपूरसह अन्य संबंधित नऊ गावांच्या हद्दीत पालख्या तथा पादुकांच्या दर्शनासाठी कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या शिखर दर्शनही करता येणार नाही. चंद्रभागा नदीत स्नानदेखील करता येणार नाही.

दरम्यान संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा देणार्‍या आस्थापनांसह आरोग्य सेवेशी संबंधित खासगी व सरकारी दवाखाने, रूग्णालये, डॉक्टर, कर्मचारी, त्यांची वाहने, रूग्णवाहिका तसेच करोना रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करणार्‍या यंत्रणेच्या कर्मचार्‍यांना, कायदेशीर कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना संचार करण्याची मुभा देण्यात आली आहे.

नऊ मानाच्या पालख्यांना परवानगी - करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आषाढी एकादशी यात्रेत पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम मोजक्या वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत होणार आहेत. यात्रेसाठी विविध पाच जिल्ह्यांतून पंढरपुरात येणार्‍या मानाच्या नऊ पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी), संत तुकाराम महाराज संस्थान (देहू), संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड, पुणे) संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जळगाव), संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण, औरंगाबाद), संत निवृत्तिनाथ महाराज संस्थान (त्र्यंबकेश्वर, नाशिक), विठ्ठल-रूक्मीणी देवस्थान संस्थान (अमरावती), संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान (सासवड) आदींचा त्यात समावेश आहे. यात्रेत पूजा व नैवेद्यासाठी दहा मठांना परवानगी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महापूजा - आषाढी एकादशीला (1जून) पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार्‍या विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी मोजक्याच मंडळींना पास देण्यात आले असून मंदिरात गर्दी टाळण्यासाठी अधिकृत पास नसलेल्या लोकप्रतिनिधींसह अन्य कोणात्याही व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com