दिल्ली | Delhi

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये करोना पुन्हा थैमान घालत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली असून, इतर राज्यातील परिस्थितीही चिंताजनक होताना दिसत आहे.

याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

जावडेकर यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, 'महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ २३ लाख लस टोचण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने ५४ लाख लसी देऊनही अत्यंत कमी लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यात केवळ ५६ टक्के लसीकरण करण्यात आलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस शिल्लक असताना शिवसेनेचे खासदार राज्याला आणखी अतिरिक्त लस हवी अशी मागणी करत आहेत. आधी करोनाच्या पहिल्या लाटेवेळी गडबड-गोंधळ केला आता लसीकरणामध्येही तेच घडत आहे, असा आरोप जावडेकर यांनी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्याचवेळी नेमकं जावडेकर यांनी ट्विट केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.