करोना चाचणी प्रयोगशाळा
करोना चाचणी प्रयोगशाळा
महाराष्ट्र

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात करोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दररोज पाचशे तपासण्या होणार

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई | Mumbai

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आगामी काळात करोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात करोनाची चाचणी करणाऱ्या राज्यात केवळ दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या ११० वर पोहोचली आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

दरम्यान जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हीड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे ई-पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन आज करण्यात आले. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बी.एस.एल. -३ या आधुनिक पद्धतीच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करोना चाचण्या करुन रुग्णांवर योग्य ते उपचार केले जाणार आहेत. आधुनिक व सुसज्ज अशा या प्रयोगशाळेत बुरशी, विषाणू, जीवंत राहू शकणार नाही, अशा पद्धतीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. एक कोटी ७ लक्ष रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून दररोज ५०० तपासण्या केल्या जातील.

कोव्हिड बरोबरच या प्रयोगशाळेत अनुवंशिकते संबंधी, एचआयव्ही, साथीचे आजार यासह अन्य तपासण्या केल्या जातील. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपणांस दररोज लवकरात लवकर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्या निकट सहवासितांची ओळख होईल व त्यांच्या देखील तपासण्या करुन करोनाची साखळी तोडण्याबरोबरच कोव्हिड बाधितांवर तातडीने उपचार करणे सोयीचे होणार आहे तसेच प्लाझ्मा थेरपी व ॲन्टीबॉडी टेस्टिंग मशिन लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com