
मुंबई । Mumbai
सध्या सणासुदीचा, सेलिब्रेशनचा काळ सुरू आहे. नाताळ आणि आठवड्याने येणारं नववर्ष यानिमित्त सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अनेकजण नववर्षाची सुरूवात ही मंदिरांमध्ये देवदर्शन करून करतात.
मात्र जगात चीन, अमेरिका, जपान सह काही महत्त्वाच्या आणि मोठ्या देशांमध्ये पुन्हा करोना (Corona) डोकं वर काढत आहे. यामुळे भारतातही प्रशासन अलर्ट मोड वर आले आहे. नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे बंधन घालण्यात आलं आहे. तसेच राज्यात अनेक प्रमुख मंदिरांनी मास्क सक्ती केली आहे.
रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती करण्यात आली आहे. कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि पुजारी यांना मास्क अनिवार्य करण्यात आला असून येणाऱ्या भाविकांनाही करोना नियमांचे पालन करण्याचा आवाहन करण्यात आल आहे. नववर्षाच्या निमित्ताने साईनगरी हमखास फुललेली दिसते. यंदा विकेंडला नाताळ आणि नववर्ष आल्याने अनेकजण धार्मिकस्थळांना भेट देण्याची शक्यता आहे. साई मंदिरामध्ये लोकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जात असाल तर मास्क घेऊन जा. कारण सप्तशृंगी मंदिर परिसरात नो मास्क, नो एंट्री! या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. सध्या नाशकात थंडीचा पारा देखील कमालीचा घसरला आहे.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नियम कडक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली असून येणाऱ्या काळात करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांना सुद्धा मास्क सक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे.
तसेच पुण्यात दगडूशेठ गणपती प्रशासनाकडून भाविकांना पुन्हा बाप्पाच्या दर्शनासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. सध्या मंदिरात मास्क घालून न येणार्यांना मंदिर स्वतः मोफत मास्क उपलब्ध करून देत आहेत. सिद्धिविनायक मंदिरामध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. देशा-परदेशातून हमखास भाविक इथे येत असल्याने आता पुन्हा मास्क बंधनकारक झाले आहेत.