अव्वाच्या सव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांना पुणे महापालिकेचा चाप

रुग्णांना दिले सव्वा तीन कोटी रुपये परत मिळवून
अव्वाच्या सव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांना पुणे महापालिकेचा चाप
पुणे

पुणे(प्रतिनिधि)

करोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णांना आणि कुटुंबीयांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. दुसरीकडे या भीतीचा गैरफायदा रुग्णालये घेत असल्याचे चित्र सर्व ठिकाणी दिसते आहे. अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करून कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट करायची हे सर्रास सुरू असून अशा लूट करणाऱ्या पुण्यातील रुग्णालयांना पुणे महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे.

पुण्यातील खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट करून पुणे महापालिकेने गेल्या नऊ महिन्यातील आठशे रुग्णांना जास्त आकारण्यात आलेले सव्वातीन कोटी रुपये परत मिळवून दिले आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

करोनाच्या सुरुवातिच्या काळात पुण्यातील खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात बिल येत होते. त्यांच्या या बिलाचे ऑडिट होत नव्हते. त्यामुळे पुणे महापालिकेने खाजगी रुग्णालयांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.

सरकारी अथवा पुणे महापालिकेच्या रुग्णालयात करोनावरील उपचार घेतल्यास उपचार मोफत होतात. खाजगी रुग्णालयांमध्ये मात्र पैसे देऊन उपचार घ्यावे लागतात. त्यातही पीपीई किट, ग्लोज, मास्क यापासून सर्वच गोष्टींचे पैसे रुग्णांच्या नातेवाइकांना द्यावे लागतात. कोरोनाची पहिली लाटेत अशा प्रकारची आर्थिक लूट रुग्णालयांकडून आणि मानसिक लूट होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिकेने ही लूट थांबविण्यासाठी बिलांचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर नेमण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेकडे अशी वाढीव बिले घेतल्याच्या 1200 तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार दीड लाखांपेक्षा जास्त असलेल्या सर्व बिलांचे ऑडिट करण्यात आले. त्यातून रुग्णांना हा दिलासा मिळाल्याचे पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या माध्यमातून जी यंत्रणा नेमण्यात आली त्या यंत्रणेत १ हजार १४९ लोकांनी तक्रारी दाखल केल्या असून ८०२ तक्रारींमध्ये खासगी रुग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. ऑडिट केल्यावर ३ कोटी २७ लाख ८७ हजार ७३३ रुपये बिल कमी झाले असून ती बिले संबंधित रुग्णांना परत करण्यात आले असल्याचे बीडकर यांनी सांगितले. दरम्यान अशाप्रकारे रुग्णालयांकडून जादा बिल आकारणी झाली असे वाटत असल्यास नागरिकांनी ०२०-२५५०२११५ या क्रमांकावर संपर्क करावा अथवा billscomplaint@gmail.com वर संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com