मुंबई । प्रतिनिधी

राज्यात करोनाचा संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेतले आणि सूचना स्वीकारल्या. ते म्हणाले की , आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही.

पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते पाळल्याने साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको.

आपण विविध सूचना दिल्या त्या सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊत यादृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्या कामी माध्यमांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्यविभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.