कृषी कायदे, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे उद्या राज्यभर उपोषण

कृषी कायदे, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे उद्या राज्यभर उपोषण

मुंबई -

नवे कृषी कायदे आणि इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी 26 मार्चला भारत बंदची हाक दिली

आहे. या भारत बंद पाठिंबा देत राज्यभरातील काँग्रेस पक्षनेते उपोषण करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक मंत्री मंत्रालयासमोरील उपोषणाला बसणार आहेत.

यातच राज्यातील सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणीही काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या उपोषणात सहभागी होणार आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष हे विभागाच्या मुख्यालयी उपोषणाला बसणार आहेत.

नाना पटोले म्हणाले, शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारे काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर गेल्या 110 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. परंतु हे कृषी कायदे मोदी सरकारने रद्द केले नाहीत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरिब जनता, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र मनमानी मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तर पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार दरोडा टाकत आहे. पेट्रोल 100 रुपये लिटर तर गॅस सिलिंडर 850 रुपये झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. मोदी सरकारच्या या मनमानी व हुकुमशाहीचा विरोध उपोषण करून केला जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com