चार हजाराहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा : बाळासाहेब थोरात

८० टक्के ग्रामपंचायतीत आघाडी विजयी
चार हजाराहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा : बाळासाहेब थोरात

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केला. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने ८० टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविल्याचेही थोरात यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणूक निकालातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामावर जनतेने विश्वास दाखवला आहे. राज्यात भाजपचा दारूण पराभव झाला असून भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा, असेही थोरात म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज घोषित झाले. त्यानंतर संगमनेर येथे पत्रकार परिषदेत बोलताना थोरात यांनी काँग्रेस आणि आघाडीच्या विजयाचा दावा केला.ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून थोरात यांनी आघाडीची ही विजयी घोडदौड या पुढेही अशीच कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर जनतेचा मोठा विश्वास असून आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यांत आतापर्यंतच्या निकालावरून काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष म्हणून समोर आला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकी प्रमाणेच जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारूण पराभव करत महाराष्ट्र विकास आघाडीला कौल देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखविलेला आहे, असे थोरात म्हणाले.

विदर्भात काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे यश मिळाले असून ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. विदर्भातील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात निर्विवाद यश टाकले आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला, येथेही काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येईल, असे थोरात यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com