मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महापालिकेला सूचना
मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा

मुंबई । प्रतिनिधी

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मान्सूनपूर्व कामांवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्या आणि नियोजनानुसार सर्व कामे वेळेत पूर्ण करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिली.सर्व मान्सूनपूर्व तयारीची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाला विविध सूचना करताना नालेसफाईसह साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराण्याचे निर्देश दिले.

मुंबईतील नालेसफाई करतानाच आवश्यक त्या ठिकाणी नाले खोलीकरण अथवा रुंदीकरण करुन त्यांची नैसर्गिक प्रवाह क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल. तसेच महामार्ग आणि पदपथाच्या बाजूला टाकण्यात आलेले डेब्रिज उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डेब्रिज टाकणाऱ्यांना सूचना द्यावी. चुकीच्या पद्धतीने डेब्रिज टाकणाऱ्यांना ताकीद देण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर मलेरीया, डेंगीची शक्यता वाढते. त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असे ठाकरे म्हणाले.

पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सुरु असलेल्या कोस्टल रोड, मेट्रो अशा कामांच्या परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने संबधित यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजना करावी, अशी सूचना केली.

मुंबईत पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य अशी ४०६ ठिकाणे शोधून तेथील आवश्यक कामे सुरु करण्यात आली आहेत. मुंबईतील ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आणि राहण्यास धोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा देणे, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आदी कामांना प्रारंभ करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यावेळी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com