पोलीस दलाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
पोलीस दलाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र पोलिसांचा Maharashtra Police आम्हाला अभिमान आहे. जगातील सर्वोत्तम पोलीस दल police force म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री Chief Minister उद्धव ठाकरे Uddhav Thackerayयांनी बुधवारी दिली.

पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल संवर्गातर्फे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.

पोलीस अंमलदार यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण असला तरी राज्य सरकारसाठी हा समाधानाचा क्षण आहे. दुसऱ्यांच्या स्वप्नाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांचे स्वतःचे असे स्वप्न असते, त्यांना भावना असतात. पोलीस हे राज्य सरकारचा कणा आहे. या सर्वांचा कणा ताठ ठेवणे, त्यांचा माणूस म्हणून विचार करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांना पुरेशा सोयीसवलती उपलब्ध करुन देण्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व केले जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे पोलीस अंमलदार यांना अधिकारी पदापर्यंत कामाची संधी मिळणार आहे. यामुळे चौकशी अभावी प्रलंबित प्रकरणांचा छडा लावणे तसेच प्रकरणे निकाली काढण्यास गती मिळणार आहे, असेही ठाकरे म्हणाले. पोलीस अंमलदारांसाठी कॅशलेस उपचार तसेच खेळाडूंना पदोन्नती या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून गृह विभागाने यासंदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

पोलीस विभागाची ताकद वाढणार : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होताना अधिकारी म्हणून निवृत्त व्हावा ही दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते. परंतु निर्णय झाला नव्हता. मी गृहमंत्री म्हणून सूत्र स्विकारल्यानंतर पोलीस महासंचालक यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्याला संमती देऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलीस विभागाची ताकद तसेच क्षमता वाढणार आहे, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या सरकारच्या भूमिकेला चालना मिळणार असून गुन्हे निकाली निघण्यास गती मिळणार आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण हे नेहमी अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिलेला कागदातला मजकूर वाचण्यापेक्षा त्यातील भावना समजून घेणे आवश्यक आहे, असे वळसे-पाटील म्हणाले.

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com