लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास सहकार्य करा; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन

मनसेनेही तात्काळ केलं 'हे' आवाहन
लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास सहकार्य करा; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन

मुंबई | Mumbai

वाढता करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. असे असले तरी राज्यातील स्थिती अधिकच गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लावायचा की कठोर निर्बंध यावर खलबत सुरु आहे.

मात्र, लॉकडाउनला विरोधी पक्ष भाजपासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील विरोध दर्शवलेला आहे. याशिवाय, सत्ताधारी पक्षात देखील याबाबत एकमत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागल्याने, काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या उद्देशाने आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.

तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर संपर्क साधून सहकार्य करावे, असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोनवरुन संवाद झाल्याची माहिती मनसेने दिली आहे.

राज्यातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं, असं मनसेनेच्या अकाऊंटवरुन सांगण्यात आलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. "आम्ही राज्यात कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहोत. विरोधी पक्ष म्हणून आपण सहकार्य करा." असे मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना सांगितले. यावर भाजप सरकारच्या पाठीशी राहील असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com