मुंबई l Mumbai

ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील सूप्त संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही. आता या संघर्षाने नवे टोक गाठल्याचे चिन्ह आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह अनेकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीय. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने परिपत्रक जारी केलं आहे. राज्यपालांना विमान वापरण्यात परवानगी मिळाली आहे की नाही याची खातरजमा न केल्यानेच राज्यपालांचा खोळंबा झाला. यात राज्य सरकारची कोणतीही चूक नाही, असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत मान्यता दिली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करुन न घेतल्याने राज्यपालांना सरकारी विमानाने इच्छित स्थळी जाता आलं नाही. राजभवन सचिवालयाने राज्यपालांबाबत पुरेशी काळजी घेणं अपेक्षित होतं. पण ते झालं नाही. राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून राजभवानातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना राज्यपालांनी सांगितलं की, “काही कारणाने ते विमान मिळालं नाही म्हणून दुसऱ्या विमानाने प्रवास केला. एक विमान नाही आवडलं तर दुसऱ्या विमानाने प्रवास केला”. यावेळी त्यांनी खासगी दौरा असल्याने परवानगी दिली नाही का? अशी विचारणा करण्यात आली असता “आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो?” अशी विचारणा त्यांनी केली.

राज्य सरकार अहंकारी - देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी प्रकार असून महाराष्ट्रात याआधी असं कधीच घडलेलं नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमतात असं आपल्या संविधानानं सांगितलं आहे. राज्यपालांना राज्य सरकारचं विमान वापरायचं असेल तर जीएडीला एक पत्र पाठवावं लागतं आणि नंतर परवानगी मिळते अशी पद्धत आहे. मला माहिती मिळाल्याप्रमाणे अशाप्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला गेला. मुख्य सचिवांना याची माहिती होती, फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं हा पोरखेळ आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच, जनतेला सर्व समजतं, जनताच याबद्दल निकाल देईल. हे सरकार किती अहंकारी आहे हे आज स्पष्ट झालं आहे, अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल - सुधीर मुनगंटीवार

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना विमानातून खाली उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल, असं म्हणत जोरदार टीकास्त्र सो़डलं आहे. सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी अशी मागणी देखील मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय थांबवावा असं म्हटलं आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.