वाळूमाफियांचा नायब तहसीलदारांवर हल्ला
महाराष्ट्र

वाळूमाफियांचा नायब तहसीलदारांवर हल्ला

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून ताब्यात घेण्याची कारवाई करतांना नायब तहसीलदार राजेश पंजे व कोतवाल जितेंद्र धनगर यांचेवर वाळू माफियांनी हल्ला चढवून मारहाण करून जखमी केले तर यावेळी वाळूचे ट्रॅक्टर घेऊन पोबारा केल्याची घटना 16 रोजी मध्यरात्री चोपडा-यावल रस्त्यावरील माचला फाट्यावर घडली.

याबाबत तिघांवर अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर घटनेचा महसुल कर्मचारी संघटना, तलाठी कर्मचारी व कोतवाल संघटनांनी निषेध केला असून आज 17 रोजी काळ्याफिती लावून आंदोलन केले. यावेळी संबधित संशयित आरोपींवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तिन्ही कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीलदार अनिल गावित यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून काही लोक तापी नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरमधून अवैध वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे नायब तहसीलदार जितेंद्र पंजे,चोपडा शहर मंडळाधिकारी राजेंद्र वाडे,लासुरचे मंडळाधिकारी डी.आर.पाटील, कोतवाल जितेंद्र एकनाथ धनगर यांच्या पथकाने काल दि.16 रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास चोपडा-यावल रस्त्यावरील माचला फाट्यावर एका विना नंबरच्या प्लेट असलेले ट्रॅक्टर व ट्रॉली अवैध वाळू वाहतूक करतांना आढळून आला.

यावेळी महसुल अधिकारी व कर्मचार्‍यांनी जागीच थांबवून चालकास वाळू  वाहतुकीच्या परवान्याची चौकशी केली असता त्याच्याकडे कसलाही परवाना आढळून आला नाही.चालकाला नाव विचारले असता जयवंत बलदेव कोळी (वय-27)रा.इंदिरानगर अडावद असे सांगितले.यावेळी ट्रॅकर मालकाचे नावाची विचारपूस केली असता कैलास तायडे व विजय कोळी यांच्या सामायिक मालकीचे असल्याचे सांगितले. दरम्यान घटनास्थळावर तीन इसम मोटारसायकलवर येऊन थांबले त्यांनी लगेच नायब तहसीलदार जितेंद्र पंजे व कोतवाल जितेंद्र धनगर यांना धक्काबुक्की करून कानशिलात लगावली.त्यांना सरकारी कर्मचारी असल्याचे सांगून देखील त्यातील एकाने नायब तहसीलदार राजेंद्र पंजे यांचा हात पिरगाळून चापटा बुक्यांनी मारहाण केली व ट्रॅक्टर बसून ट्रॅक्टर घेऊन पळून गेले.यावेळी कर्मचार्‍यांनी त्यांचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत ते पळून गेले.या प्रकरणी संशयित आरोपी जयवंत बलदेव कोळी यास अटक करण्यात आली आहे. तर कैलास तायडे व विजय कोळी दोघे अद्याप फरार आहेत.

महसुल कर्मचारी संघटनेकडून निषेध

महसूल कर्मचारी संघटना, तलाठी कर्मचारी संघटना व कोतवाल कर्मचारी संघटना यांनी निषेध करून काळ्याफिती लावून आंदोलन केले.यावेळी कर्मचार्‍यांच्या संघटनेच्या वतीने तहसीलदार अनिल गावित यांना आज सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात आले.घटनेतील संशयित आरोपींवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महसुल कर्मचार्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आजच्या आंदोलनात महसुल,तलाठी व कोतवाल कर्मचारी संघटनेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com