
अहमदनगर | Ahmednagar
सध्या सोशल मीडिया हे मनोरंजनाचं सर्वांत मोठं साधन बनलं आहे. तुमच्यापैकी अनेक जण फावल्या वेळेत फेसबुकवरचे व्हिडिओ किंवा इन्स्टाग्रामवरची रील्स बघत असतील. या व्हिडिओजपैकी काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात, तर काही फारच मजेशीर असतात.
नुकताच ७४ वा प्रजासत्ता दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या दिवशी अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे महत्व, इतिहास सांगणारी भाषण झाली. (Definition Of Democracy)
याच दिनानिमित्त एका लहान मुलाने अतिशय तुफान असं भाषण केलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील मुलाने लोकशाहीची अशी काही भन्नाट, जबरदस्त आणि खतरनाक पद्धतीने व्याख्या समजावली आहे, जी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. (Republic Day)
चिमुकला भाषणात काय म्हणतो?
'खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता. भांडू शकता... दोस्ती करू शकता... प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला... खोड्या करायला... रानात फिरायला... माकडासारखे झाडावर चढायला आवडते. असे केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण, ते लोकशाहीला मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात.
लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात, तसं सर मला कधी कधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही.'
दरम्यान या मुलाच्या शाळेचं आणि त्याचं नाव कळू शकलेलं नाही. पण त्याचे बोल ऐकून कुणालाही त्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही. चिमुकल्याच्या शब्दातला निरागसपणा अनेकांना भावतोय. शाळेतल्या मुलाचा धाडसीपणा भाव खाऊन जातोय. म्हणून अवघ्या काही तासात लाखो जणांनी निरागस बोलांवर लाईक्सचा अक्षरश पाऊस पडलाय.