व्याघ्र संरक्षणात समन्वयाने काम करा; मुख्यमंत्र्यांची सूचना

व्याघ्र संरक्षणात समन्वयाने काम करा; मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यात व्याघ्र संरक्षणासाठी (Tiger protection) महावितरण, पोलीस, महसूल तसेच वन विभागासह (Forest Department) सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे. जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षक‍ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले...

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज वन विभागाची दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक पार पडली. राज्यातील वाघांची संख्या आणि जागेचे प्रमाण व्यस्त असल्याने तात्पुरत्या उपाययोजना न करता कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेता येतील याचा प्राधान्याने विचार करावा, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

पोलिसांची (Police) मदत घेऊन तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन खबऱ्यांचे जाळे निर्माण करावे. वाघांची शिकार होणार नाही यादृष्टीने जनजागृती (Awareness) करताना कायद्याची कडक अंमलबजावणी केली जावी, जॉईंट पेट्रोलिंग केले जावे. कडक शिक्षेची तरतूद करणे गरजेचे वाटल्यास आवश्यकतेनुसार कायद्यात बदलही करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

वन व्यवस्थापन (Forest management) करताना वाघांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन त्याच्या भविष्यकालीन व्यवस्थापनाचे नियोजनही करण्यात यावे. ज्या ठिकाणी वन्यजीवांचे अपघात होतात अशी क्षेत्रे निश्चित केली जाऊन तिथे आवश्यक त्या पर्यायी उपाययोजना राबविण्यात याव्यात.

जंगलात (forest) विकास कामे करताना विशेषत: रेल्वे लाईनचे नियोजन करताना राज्याच्या वन विभागाशी चर्चा करून त्याचे नियोजन केले जावे जेणेकरून वन्यजीवांना होणारा धोका टाळता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.

नवीन संवर्धन राखीव क्षेत्राचा व्यवस्थापन आराखडा तयार करावा : आदित्य ठाकरे

सरकारने नव्याने जाहीर केलेल्या संवर्धन राखीव क्षेत्रांचा व्यवस्थापन आराखडा लवकरात लवकर तयार करावा, अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बैठकीत दिल्या. हे संवर्धन राखीव घोषित केल्याने संरक्षित वन क्षेत्रातले ग्रीन कव्हर वाढले का हे पहावे. तसेच ज्याठिकाणी पुनर्वनीकरण करणे आवश्यक आहे तिथे वृक्षलागवड केली जावी. महामार्गालगतही वृक्षलागवडीचा विचार केला जावा, असेही ते म्हणाले.

बैठकीत राज्य वन्यजीव मंडळाच्या १६ व्या बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या १० पैकी ८ संवर्धन राखीव क्षेत्राची अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित दोन संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

राज्यात एकूण ७१ संरक्षित क्षेत्रे अधिसूचित करण्यात आली आहेत. यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था देहरादून यांनी केलेल्या गणनेत राज्यात ३१२ इतकी वाघांची संख्या असल्याचे दिसते.

फक्त चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात २०० वाघ आढळून येत असल्याने तिथे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वारंवार घडतांना दिसतात. त्यावर उपाययोजना करण्यासाठी विशेष अभ्यासगटाने दिलेल्या शिफारसी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्य केल्या गेल्या असून त्यावर कार्यवाही सुरु असल्याची माहिती ही बैठकीत देण्यात आली.

विद्युत प्रवाहामुळे वाघ आणि अन्य वन्यजीवांचा मृत्यू होऊ नये म्हणून वन विभाग तसेच महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त गस्त घालण्यात येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com