<p>मुंबई । Mumbai</p><p>मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. </p>.<p>करोनाचा धोका, मेट्रो कारशेड आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून होणारे आरोप यासर्वाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. एकीकडे करोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात पेटून उठले आहेत. त्यामुळे या सगळ्यावरून काही मोठा निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं आता जनतेसाठी महत्त्वाचं असणार आहे.</p>.<p>उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात 22 तारखेला जनतेशी संवाद साधला होता. त्यानंतर आता रविवारी जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधण्यासाठी ते येणार आहेत. गेल्या संवादात त्यांनी कोरोनाचे सावट अद्याप कायम आहे त्यामुळे नागरिकांनी गर्दी करु नका असे आवाहन केले होते. तसेच आतापर्यंतच्या कोरोनाच्या काळात नागरिकांनी ज्या पद्धतीने राज्य सरकारला सहकार्य केले होते त्या पद्धतीने पुढे ही करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु आता उद्याच्या संवादात उद्धव ठाकरे नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांच्या संदर्भात काही बोलणार का? राज्यात नाईट कर्फ्यू लावणार का असे विविध प्रश्न आता लोकांना पडू लागले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे उद्या कोणती घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.</p>