उद्योगांना स्वस्त दरात वीज?

उद्योग आणि उर्जामंत्र्यांची उद्योजकांसोबत बैठक; पुढील महिन्यात निर्णय होण्याची शक्यता
उद्योगांना स्वस्त दरात वीज?

मुंबई । प्रतिनिधी

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगांना आता स्वस्त दरात वीज मिळणार आहे. स्वस्त दरात वीज देण्याबाबत सरकार सकारात्मक असून पुढील महिनाभरात याबाबतचा ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज पुरवठा करण्याबाबत मंगळवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींसोबत महत्वाची बैठक पार पडली. वीजेच्या बाबतीत उद्योग क्षेत्राला स्वंयपूर्ण बनवण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य आहे. नुकतेच उद्योग विभागाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत १ लाख १२ हजार कोटीं रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. राज्याकडे गुंतवणुकीचा ओघ वाढत असताना इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज महाग पडते. त्यामुळे विजेचे दर कमी करण्याची मागणी विविध उद्योग संघटनांकडून यावेळी करण्यात आली.

नव्याने गुंतवणूक झालेल्या डेटा सेंटर्ससाठी २४ तास अखंडीत वीज देण्याची मागणी काही संघटनांनी केली. दरम्यान, खुल्या बाजारातून वीज खरेदीची परवानगी मिळावी, सौर उर्जा निर्मितीला प्रोत्साहन मिळावे तसेच उद्योग क्षेत्रावर पडणारा इतर क्षेत्राचा बोजा कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यास उर्जा तसेच उद्योग विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

वस्रोद्योग, ग्रीनफिल्ड तसेच पोलाद आदी उत्पादने घेणाऱ्या उद्योगांना वीज दरात सवलत देण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. इतर उद्योगांनाही दिलासा देण्याबाबत महिनाभरात निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्य सरकार वीजेसंदर्भ नवे धोरण आखत असून त्यात उद्योगांच्या वीजदराचा मुद्दा मांडण्यात येईल, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com