
मुंबई | Mumbai
येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत असले, तरी त्याचा प्रभाव फारसा नसल्याने थंडी कमी झाली आहे असं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. विदर्भातील जवळपास सर्वच भागांत काहीशी थंडी कमी झाली असल्याने किमान तापमानाचा पारा सरासरीहून अधिक वाढला आहे. विदर्भात १७ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मराठवाड्यातही थंडी नसल्याने किमान तापमानात १६ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात गारवा असला, तरी ढगाळ हवामानामुळे दिवसभर उन्हाचा चटका व रात्री काहीसा गारवा आहे. कोकणातील किमान तापमानात झपाट्याने बदल होत असले, तरी किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग या ठिकाणी हलका पाऊस पडेल.