
पुणे | Pune
पुण्याहून वरंदा घाटमार्गे (Pune Bhor-Varanda) महाडला जाणारी कार निरा देवघर धरणाच्या (Nira-Devdhar Dam) पाणलोट क्षेत्रात कोसळली. या कारमधील ४ जण होते. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले आहे. गाडीतील ३ जण बुडाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.
पुणे घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त आहे. या पावसामुळे घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे पुणे आणि रायगड प्रशासनाने वरंधा घाट रस्ता बंद केला आहे. वरंधा घाट बंद केल्यानंतर ताम्हिनी घाटाचा पर्याय वाहन धारकांना आहे. परंतु प्रशासनाचा आदेश मोडून काही जण धोकादायक पद्धतीने वरंधा घाटातून प्रवास करत आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील ही कार भोरहून पुढे वरंदा घाटातून जात होती. धुके आणि पाऊस यामुळे कारचालकाला रोडचा अंदाज आला नाही. कार कठडा तोडून घाटातून निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मोटारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते कारमधील एक जण बाहेर आला आहे. भोर पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. तिघांचा शोध सुरु आहे.
अपघात ग्रस्त हे पुण्यातील रावेर येथील असल्याचे समोर आले आहे. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी रवाना झालेले आहेत. वरंधा घाटात सर्व वाहनांना बंदी असूनही आज पहाटे पुण्याहून ही कार घाटात गेली होती.