मंत्रिमंडळाची बैठक 'डेक्कन ओडिसी'त

मंत्रिमंडळाची बैठक 'डेक्कन ओडिसी'त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील पर्यटनाचे वैभव जपा, जोपासा, वाढवा. हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सोमवारी येथे केले...

करोना (Corona) काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर (Brand Ambassador) झाला पाहिजे.

इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात (Maharashtra) विकसित व्हावे असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये (Deccan Odyssey train) घेण्यात येईल, असे जाहीर केले.

राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्यावतीने आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त (World Tourism Day) सह्याद्री अतिथीगृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, करोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. तथापि या कालावधीत विभागाने कोविडनंतर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठीचे धोरण आणि नियोजन केले. अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.

या निमित्ताने आजवर दुर्लक्षित असलेल्या विभागाचे महत्व अधोरेखित झाले आहे. आपण आपले वैभव जगासमोर आणत आहोत, हे करीत असताना नवीन पर्यटन स्थळेही विकसित करा. सध्या सुरू असलेल्या कामाच्या माध्यमातून 'महा'राष्ट्र खऱ्या अर्थाने जगासमोर येईल, असा विश्वास व्यक्त करून ठाकरे यांनी सरकार कायम चांगल्या योजनांच्या पाठिशी राहील, अशी ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी 'सर्वांगीण विकासासाठी पर्यटन' हे घोषवाक्य सर्वार्थाने सार्थ ठरवणारी वाटचाल सुरू असल्याबद्दल पर्यटन विभागाचे कौतुक केले.

राज्यात गड किल्ले, किनारपट्टी, साहसी पर्यटन, धार्मिक स्थळे, शैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटन अशा पर्यटनाच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करून पर्यटकांना आकर्षित करताना पर्यटन स्थळांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत असलेल्या चिपी विमानतळाचा कोकणातील पर्यटनाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटकांनी आधी महाराष्ट्र फिरावा, त्यानंतर इतरत्र जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देताना राज्यात पर्यटन विकासाच्या सर्व बाजूंचा विचार होत असल्याबद्दल विभागाचे कौतुक केले.

इतर देशांपेक्षा आपल्याकडे खूप काही आहे, हे जगाला दाखवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणापासून विदर्भापर्यंत असलेली विविधता जगासमोर आणताना स्थानिकांना विविध मार्गांनी रोजगाराच्या संधी निर्माण करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई विद्यापीठाच्या इमारतींची ऐतिहासिक वारसा सफर या उपक्रमाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

यानुसार, आता शनिवारी आणि रविवारी मुंबई उच्च न्यायालय तर सार्वजनिक सुट्यातसेच सर्व रविवारी मुंबई विद्यापीठाच्या वास्तूत पर्यटकांना प्रवेश खुला केला जाणार आहे. ही संपूर्ण सहल टूर गाईड असोसिएशन प्रमाणित मार्गदर्शकांच्या सहकार्याने पार पडेल.

संकेतस्थळ आणि ॲपचे उदघाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनाच्या सुधारित संकेतस्थळाचे आणि महाराष्ट्र टुरिझम या मोबाईल ॲपचे उदघाटन करण्यात आले. या संकेतस्थळाच्या सुधारित आवृत्तीत मराठी भाषेसह एकूण ९ विविध भाषांमध्ये पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील तब्बल ३५० पर्यटनस्थळांची थीम नुसार वर्गीकृत करून माहिती देण्यात आली आहे.

यावेळी पर्यटन संचालनालयाच्या कोकण पर्यटन विभागाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील नव्या कार्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील सहा विभागातील आकर्षक रंगछटांनी रंगवलेल्या सहा पर्यटन भिंतींचेही अनावरण करण्यात आले.

स्थानिक कलाकारांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात प्रत्येक प्रदेशातील पर्यटक आकर्षणे, ऐतिहासिक वारसास्थळे, ख्यात व्यक्ती, कला आणि संस्कृतींचा मेळ घालणाऱ्या सुंदर कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com