
नाशिक । प्रतिनिधी
सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक जाणवत नसुन पुढील संपूर्ण पंधरवाडा म्हणजेच गुरुवार दि.७ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकणात व काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यताच अधिक जाणवते,असा अंदाज पुणे वेध शाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम पावसाची शक्यता मात्र कायम आहे. तटस्थ ' भारत महासागरीय द्वि- ध्रुविता ' व कमकुवत का असेना पण सध्या अस्तित्वात असलेला पण शेष उर्वरित पावसाळी हंगामात विकसनाची शक्यता ठेवून असणारा ' एल-निनो ' आणि सध्या भारत विषववृत्तीय महासागरीय क्षेत्राच्या बाहेर भ्रमणित असलेला ' एमजेओ '.
खाली वर सरकणारा पण सध्या सरासरी जागा सोडून अधिक उत्तरेकडे सरकलेला पूर्व- पश्चिम ' मान्सूनचा आस ''.कमकुवत झालेली मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा. ऐतिहासिकरित्या उदभवून गेलेला ऑगस्ट महिन्यातील यावर्षीचा पावसाचा खण्ड.या सर्व ६ वातावरणीय प्रणाल्या चालु ऑगस्ट महिन्यातील पावसास प्रतिकूल ठरलेल्या आहेत.
याउलट मात्र देशाच्या अतिउत्तरेकडे एकापाठोपाठ नियमितपणे येणारे ' पश्चिमी झंजावात ' व त्याचबरोबर उत्तरेकडे स्थलांतरित होणारा आणि अधिक काळ हिमालय पायथा समांतरित क्षेत्रात जाऊन बसलेला 'मान्सूनी आस ' यामुळे संपूर्ण उत्तर भारतात यावर्षीच्या जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालून महापुराने जनजीवन विस्कळीत करून हिमालय पर्वतीय भू -क्षेत्रही त्याने चांगलेच खिळखिळे केले आहे. २ महिने तेथील पर्यटनही धोक्यात आणले आहे.
जून, जुलै, ऑगस्ट ३ महिने एल-निनो सुप्तावस्थेत तर आयओडी तटस्थवस्थेत असतांनाही समाधानकारक पाऊस झाला नाही. तर मग आता वर स्पष्टीत केलेल्या ६ प्रणाल्यांचा सध्या अमंल असतांना आणि त्यातही विशेषतः एल- निनो विकसनाकडे जाणारी शक्यता पाहता पुढे पावसाची अपेक्षा कोणत्या आधारावर करावी,असा प्रश्न आहे.
या प्रतिकूलतेत, १ सप्टेंबरनंतर केंव्हाही राजस्थानातून मागे फिरणारा परतीच्या पाऊस आणि त्याचबरोबर नेमका याच संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून पूर्वा, उत्तरा, हस्त, व चित्रा या ४ नक्षत्रातून पडणाऱ्या पूर्वेकडचा ठोकवणी पावसाची तरी काय अपेक्षा ठेवावी? म्हणूनच साशंकता वाटते. मग या नकारात्मक तर्कला केवळ फक्त आय.ओ.डी.(भारत महासागरीय द्वि- ध्रुविता) या प्रणालीचा टेकू हा आशावाद असला तरी, ज्याने गेले ३ महिने साथ दिली नाही, त्याच्याकडून सप्टेंबरसहीत उर्वरित दिड महिन्यात पावसासाठी काय अपेक्षा ठेवावी? कारण अजुनही तो तटस्थवस्थेतच आहे.
केवळ पावसावरच अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामातील सध्याची जिरायत उभी पिके सध्या पाणी ताणावर असुन बिकट अवस्थेतून जात आहेत. तर काही जळण्याच्या मार्गांवर आहेत. शेतकरी तेथे रोटवेटर मारण्याच्या मनस्थितीत आहेत.
निसर्ग आहे, आणि काही तरी पाऊस होईलच, या आशेवर, खरीपात हिरमोड झालेले शेतकरी पुन्हा रब्बी हंगामाचा ' श्री गणेशा ' करण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा आता रब्बी हंगामातही अश्या क्षेत्रात जपूनच पावले टाकावी, असे वाटते. शेती निगडीत महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, साखर कारखानदारी, तसेच सिंचन विभाग यांनाही या पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यावसायिक नियोजनात गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊ शकते, असे वाटते.
कारण, कितीही सौम्य शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती झाकता येत नाही. मान्सूनचे सध्याचे सर्व वास्तव व विश्लेषण आपल्यासमोर ठेवलेलेच आहे.यासर्व शक्यतेची कल्पना शेतकऱ्यांनी करून पुढील शेतपीक नियोजनाचा व संबंधित व्यवसायाचा निर्णय आपण स्वतःच घ्यावा, असे वाटते असेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.