ब्रेक द चेन : उद्योजकांनी नियमांचे पालन करावे - सुभाष देसाई

ब्रेक द चेन :  उद्योजकांनी नियमांचे पालन करावे - सुभाष देसाई
उद्योग मंत्री सुभाष देसाई

मुंबई -

करोनाला रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, निरंतर प्रक्रिया करणारे उद्योग या सार्‍यांना उत्पादन सुरु ठेवण्याची संमती आहे. परंतु, उद्योग विश्‍वाने राज्य शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करावे आणि शासनाने जारी केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. वसई-विरार परिसरातील तीन औद्योगिक संघटनांचा वतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

शासनाने निर्यात प्रधान उद्योग सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, निरंतर प्रक्रिया करणारे उद्योग या सार्‍यांना उत्पादन सुरु ठेवता येणार आहे. उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे देसाई म्हणाले. वसई-विरार परिसरातील उद्योग संघटनांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी कोविड चाचण्या, रुग्णालय आदी सुविधा सज्ज ठेवल्याबद्दल देसाई यांनी संबंधितांचे कौतुक केले.

उद्योगांमध्ये 20 ते 40 वयोगटातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने काम करतो. लसीकरणासाठी 45 वर्षे वयाची अट आहे. ती अट शिथिल करून या 20 ते 40 वयोगटातील कामगारांचा लसीकरणासाठी समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे देसाई यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com