मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

भाजपची उच्चस्तरीय समिती स्थापन ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

मुंबई । प्रतिनिधी

सरकारी नोकरी आणि शिक्षणात पुन्हा आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाच्यावतीने होणाऱ्या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा असेल. आंदोलनात पक्षाचे नेते, कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने सहभागी होतील, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केली. मराठा आरक्षणासाठी आपल्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी गठीत करण्यात आलेल्या भाजपच्या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आमदार आशिष शेलार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द ठरविल्यानंतर मराठा समाजाला एकटे पडलो आहोत, आपल्यासोबत कोणताही नेता नाही असे वाटते. परंतु, पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजातील विविध संघटना जे आंदोलन करतील, त्यामध्ये भाजप त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन सहभागी होईल. आंदोलनाची स्वायत्तता भाजप कायम राखेल. तेथे पक्षाचा झेंडा किंवा नाव असणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, त्याचा कायदा उच्च न्यायालयात टिकवला आणि फडणवीस सरकार सत्तेवर असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही या कायद्याला स्थगिती आली नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील अनेक परिच्छेदात महाविकास आघाडी सरकारच्या चुका तसेच ढिलाई दिसून येते. आघाडीने हा खटला जिद्दीने लढविला नाही. निकालपत्राचा अभ्यास करून महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप कायदेतज्ञांची समिती नेमणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पुन्हा लॉकडाऊन लावला जात आहे. जेणेकरून मराठा समाजाचा संताप उफाळून येऊ नये, असे सरकारला वाटते. अशा प्रकारे लॉकडाऊन लाऊन मराठा समाजाचा संताप थंड होईल;असे सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी बजावले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com