केवळ वाचनातनूच चारित्र्यसंपन्न समाज आणि देश घडतो

केवळ वाचनातनूच चारित्र्यसंपन्न समाज आणि देश घडतो

पुणे |प्रतिनिधि| Pune

साहित्य, संस्कृती, वाचन या माध्यमातून घडलेला समाज आणि भारत हा आपला वैश्विक चेहरा आणि वैश्विक ओळख आहे. केवळ वाचनातूनच चारित्र्यसंपन्न समाज आणि देश घडतो, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्याम जाजू यांनी व्यक्त केले. 

दिलीपराज प्रकाशनाच्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा  'दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार' यावर्षी ज्येष्ठ ग्रंथ वितरक कोल्हापूर येथील मेहता बुक सेलर्सचे प्रमुख अनिल मेहता यांना आज प्रदान करण्यात आला,  त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्याम जाजू बोलत होते.

एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी  व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे,  दिलीपराज प्रकाशनाचे संचालक मधुर बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी दिलीपराज प्रकाशनाच्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या व्यासपीठासाठी प्रा. द.के. बर्वे यांच्या स्मरणार्थ दहा लाख रूपयांची देणगी दिलीपराज प्रकाशनातर्फे देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी लिखित 'समकालीन अध्याय' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.                                                                                              

यावेळी बोलताना श्याम जाजू म्हणाले की, आजच्या डिजीटल युगातही पुस्तक आणि वाचन याला अनन्यसाधारण महत्त्व असून उद्याचा सक्षम भारत घडविण्यात वाचन मोलाची भूमिका बजावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सगळ्या संस्कारांचे महत्त्व माहिती असल्याने साहित्य आणि वाचन चळवळीला बळ प्राप्त होईल, अशी ध्येय धोरणे त्यांच्याकडून आखली जातात. ते वाचनाचे महत्त्व जाणून असल्याने ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना सर्व व्यापाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना साडेदहा ते अकरा या वेळेत केवळ वाचन करण्याचे आवाहन करीत असत. प्रकाशन व्यवसाय हा एक ध्येय घेऊन काम करण्याचा व्यवसाय आहे. दिलीपराज प्रकाशन किंवा आज ज्यांना पुरस्कार देण्यात आला त्यांनी स्थापन केलेले मेहता प्रकाशन हे ध्येय घेऊन काम करणाऱ्या  प्रकाशकांपैकी आहेत.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, अलीकडचे मराठी लेखक हे टोकाचे डावे किंवा टोकाचे उजवे अशा दोन भागात विभागले गेले आहेत. कोण्याएका विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन आपण आपली साहित्यिक भूमिका मांडू शकतो, अशा भ्रमात ते दिसून येतात. परंतु, सर्वच विचारधारांच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने मराठी लेखक गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. मराठी लेखकांनी कुठल्याही विचारधारेचा उदोउदो करण्याऐवजी सत्याची कास धरून लेखन करणे आवश्यक आहे. सत्य हे नेहमी अल्पमतात असते. परंतु, त्यामुळे त्याचे मोल कमी होत नाही.

सत्काराला उत्तर देताना अनिल मेहता म्हणाले की, मी आजही पुस्तक विक्रेता या भूमिकेतून काम करीत आहे. डिजीटलायझेशन आणि ऑनलाईनमुळे पुस्तकांचा खप कमी होतो, ही ओरड चुकीची असून तुम्ही एक ध्येयाने, एक दिशेने काम करीत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुर बर्वे यांनी केले. मधुमिता बर्वे यांनी मानपत्राचे वाचन केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. राजीव बर्वे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com