रायगडच्या पेणमध्ये भाजपला खिंडार
महाराष्ट्र

रायगडच्या पेणमध्ये भाजपला खिंडार

माजी नगराध्यक्षांसह ६ आजी आणि पाच माजी नगरसेवकांची राष्ट्रवादीत घरवापसी!

Kishor Apte

Kishor Apte

राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपच्या ऑपरेशन लोटसला शह देण्यासाठी घरवापसीच्या कार्यक्रमाची सुरूवात रायगड जिल्ह्यातील पेण शहरांतून केली आहे. येथे भाजपला जोरदार खिंडार पडले आहे.

पेणमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखाली सहा विद्यमान नगरसेवक आणि पाच माजी नगरसेवकांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा राष्ट्रवादी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, माजी नगरसेवक जितेंद्र ठाकूर, विलास मनोरे, दीपक गुरव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पेण येथील गांधी मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, नगरसेविका वसुधा पाटील, राजेंद्र वाडकर, मंगेश पेडामकर, अर्पिता कुंभार, भावना बांधणकर, प्रतिभा जाधव या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक हबीब खोत, कृष्णा भोईर, बाळकृष्ण नाईक, तुकाराम पाटील व पांडुरंग जाधव, वाहीद खोत, रफिक झटाम, विशाल बाफना, तजीम मुकादम, भूषण कडू , किरण शहा, प्रसन्न पोटे, निकित पाटील, संजय कांबळे, सुरेश म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढील काही महिन्यांत पेण नगरपालिकेची निवडणुक होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण शहर अध्यक्ष अस्लम नाईक यांचे नुकतेच कोरोनामुळे दुःखद निधन झाले असल्याने त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या घरवापसी अभियानाची सुरूवात झाली असून आता तालुका आणि जिल्हा निहाय दर रोज मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ता नबाब मलिक यानी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com