'त्या' वादग्रस्त विधानावर राज्यपाल कोश्यारी यांचा खुलासा

'त्या' वादग्रस्त विधानावर राज्यपाल कोश्यारी यांचा खुलासा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान भगतसिंह कोश्यारी यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

'नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल,' असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच 'मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला,' असं त्यांनी म्हटलं आहे.

'काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करुन महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही,' असे त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com