विवाह संकेतस्थळावर भेट देताय... सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा

‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन
विवाह संकेतस्थळावर भेट देताय... सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा
सायबर क्राइम

मुंबई । Mumbai

विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात येत आहे.

सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलामुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी अनेक ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नोंदणी करतात. बऱ्याच विवाह जमविणाऱ्या संस्थांनी पण आता स्वतःच्या वेबसाईट सुरु केल्या आहेत. ज्यावर ते सर्व उपवर मुले व मुलींच्या पालकांना नोंदणी करण्यास सांगत आहेत. बऱ्याचदा पालक किंवा मुलगा /मुलगी स्वतः या वेबसाईटवर प्रोफाईल बनवून त्यात आपली माहिती ,परिवाराची माहिती व फोटो अपलोड करत आहेत. अशी माहिती एखाद्या सायबर गुन्हेगाराच्या हाती लागल्यास नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते.

अशा वेबसाईटद्वारे ऑनलाईन फसविले जाणाऱ्यांची संख्यादेखील बऱ्याच प्रमाणात आहे . दुर्दैवाने यामध्ये फसलेल्या मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेने जास्त आहे.

फसवणुकीचे प्रकार

सोशल मिडीयावर किंवा विवाह संकेतस्थळावर नावनोंदणी केल्यानंतर मॅच झालेली प्रोफाईल मिळत असते. यामध्ये देशातील किंवा अनेकदा परदेशातील व्यक्तीची असू शकते. या दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढतात, ओळख वाढते व समोरील व्यक्ती कालांतराने आपल्या बोलण्याने मोहित करते. मग एके दिवशी ती व्यक्ती तुम्हाला सांगते की ते परदेशातून तुम्हाला काही महागडी भेट वस्तू पाठवत आहे. नंतर फोन येतो की, तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे व कस्टम क्लिअरन्सकरिता अडकले आह. त्यामुळे एका ठराविक अकाउंट मध्ये ऑनलाईन ठराविक रक्कम भरावी कि २ दिवसात तुमचे पार्सल तुम्हास मिळेल. पैसे अकाउंटमध्ये भरले तरी पार्सल येत नाही. तो नंबरपण बंद होतो व तसेच तुम्ही ज्या प्रोफाईलवरील व्यक्तीशी बोलणे चालू होते ती प्रोफाईल व सोशल मिडिया अकाउंट अचानक डिअक्टिवेट होते .

अशा प्रकरणामध्ये एकतर घटस्फोटित किंवा ज्यांचे जोडीदार जग सोडून गेलेत किंवा ज्यांची लग्न काही कारणाने होऊ शकले नाहीत अशा व्यक्ती असतात त्यातपण महिलांची संख्या अधिक आहे. संभाषण सुरु झाल्यावर प्रकार क्रमांक १ प्रमाणेच समोरील व्यक्ती कधी तुम्हाला महागडी भेट वस्तू अडकली आहे या कारणाने तर कधी आपण आर्थिक विवंचनेत आहोत असे भासवून काही रक्कम घेते व नंतर गायब होते.

अशी घ्या काळजी

प्रोफाईल बनविताना आपली सर्वच माहिती त्यात देऊ नका.

एखाद दुसरा फोटोच अपलोड करा.

प्रत्यक्ष मुलाचा किंवा मुलीचा मोबाईल क्रमांक देऊ नका घरातील कोणत्यातरी वयाने मोठ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक द्या.

परदेशातील भारतीय प्रोफाईलने मॅच केले म्हणून हुरळून जाऊ नका उलट अशा स्थळाची अजून सखोल चौकशी करा.

सर्व वैयक्तिक माहिती व खाजगी फोटोज शेअर करू नका.

जर अशी व्यक्ती तुमच्याकडे काही आर्थिक मदत मागत असेल तर वेळीच सावध राहा.

ज्या व्यक्ती विशेष करून महिला ज्या पुनर्विवाह करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी तर जास्त सावध राहणे गरजेचे आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com