आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे कालवश

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे कालवश

पुणे | Pune

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe) (८१) यांचे आज निधन झाले. मागील आठवड्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले...

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. सुमारे पाच दशकांपासून त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचाराचा प्रसार केला.

आयुर्वेद हे राज्य किंवा देशभरापुरतेच मर्यादित न ठेवला त्यांनी जगभरात आयुर्वेदाचा प्रसार करून त्याचे महत्व पटवून दिले. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनील, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे.

नव्या पिढीत आयुर्वेदाची गोडी तयार केली- मुख्यमंत्री

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.मुख्यमंत्री श्री. ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील.

श्रीमतभगवद्गीतेचे ज्ञान जगात पोहचवले- राज्यपाल

आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. तांबे यांनी आरोग्यविषयक लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमतभगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com