राज्यपाल, फडणवीस, पटोले, वळसे-पाटील एकाच मंचावर

राज्यपाल, फडणवीस, पटोले, वळसे-पाटील एकाच मंचावर

मुंबई | Mumbai

समाजात परिवर्तन अनेक लोकांच्या सामूहिक प्रयत्नातून घडत असते. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील अग्रणी लोकांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन योगदान देणे आवश्यक असते. विविध क्षेत्रातील चॅम्पियन्स समाजासाठी प्रेरणास्रोत असून त्यांनी आपापल्या क्षेत्रांत अधिकाधिक योगदान दिल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन निश्चितपणे येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांसह ३५ जणांना उल्लेखनीय कार्यासाठी चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. श्री. फडणवीस यांच्या वतीने माजी आमदार राज पुरोहित यांनी पुरस्कार स्वीकारला.

हॉटेल ताजमहाल येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन इंटरऍक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी तसेच पंचायती टाइम्स न्यूज पोर्टलतर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाला फोरमचे अध्यक्ष नंदन झा व ज्येष्ठ पत्रकार डॉ.वेद प्रताप वैदिक उपस्थित होते.

माजी सरन्यायाधीश न्या. के जी बालकृष्णन व सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती ग्यानसुधा मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले मातृभाषेला महत्त्वाचे स्थान मिळाले पहिजे. आपण राज्यपाल पदाची शपथ मराठी भाषेतून घेतली, तसेच कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांच्या पदवीदान समारोहांचे सूत्रसंचलन मराठी भाषेतून करण्याचे सूचित करून परिवर्तन आणले. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या उत्पादनांना लोकप्रिय करण्यासाठी प्रादेशिक भाषांचा आधार घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व नाना पटोले यांनी सत्काराला उत्तर दिले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, पोपटराव पवार, शांतीलाल मुथा, उषा काकडे, अभिनेत्री दिया मिर्झा, मोतीलाल ओसवाल, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ यांना देखील चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्कार देण्यात आले.

Related Stories

No stories found.