औरंगाबादेत 30 जूनपर्यंत जाणवणार लसींचा तुटवडा

अडीच लाखांचा टप्पा पूर्ण
औरंगाबादेत 30 जूनपर्यंत जाणवणार लसींचा तुटवडा

औरंगाबाद - Aurangabad :

करोनाला रोखण्यासाठी महापालिकेने लसीकरणाची जय्यत तयारी केली आहे. रोज किमान 10 ते 15 हजार नागरिकांचे लसीकरण होऊ शकेल, असे नियोजन केले आहे.

मात्र शासनाकडून लसींचा खूपच कमी पुरवठा होत आहे. ही परिस्थिती 30 जूनपर्यंत अशीच राहणार आहे, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

आजघडीला कोरोनाला रोखण्यासाठी लस हा एकमेव पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सर्वच 115 वॉर्डात प्रत्येकी एक, दोन सरकारी व 26 खासगी रुग्णालयात लसीकरणाची केंद्रे सुरू केली.

त्यानुसार पाच एप्रिलपासून जम्बो लसीकरण मोहीम सुरूकेली होती. एका दिवसात विक्रमी म्हणजेच दहा हजारापेक्षा जास्त लसीकरण पालिकेने केले.

मात्र आता मागील काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जाणवत आहे. पालिकेची एका आठवड्यासाठी किमान एक लाख लसी मिळाव्यात, अशी मागणी आहे. मात्र शासनाकडून कधी पाच, कधी दहा हजार एवढ्याच लसींचा पुरवठा होतो आहे.

याबाबत आयुक्त पांडेय यांनी सांगितले की, पालिकेने रोज 15 हजार नागरिकांचे लसीकरण करता येईल, अशी तयारी ठेवली आहे.

मात्र लसींचा तुटवडा असल्याने ठराविक केंद्रावरच सध्या लसीकरण सुरू आहे. साधारणतः 30 जूनपर्यंत लसींचा तुटवडा कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजवरच्या लसीकरणातून पालिकेने लसीकरणाचा अडिच लाखांचा टप्पा पार केला आहे. शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुमारे चार महिन्यात 2 लाख 56 हजार 154 जणांना लस देण्यात आली आहे, असे महापालिकेने दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com